VBA Prakash Ambedkar News: मोहन भागवत यांचे नाव गेल्या सहा महिन्यात वर्तमानपत्रात ऐकले आहे का, तर नाही. अटलबिहारी वाजपेयी संघ कार्यालयात जात होते. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयात गेलेले नाहीत. मोहन भागवत यांनी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे वेळ मागितली, त्यावेळेस ती वेळही दिली नाही, अशी परिस्थिती आहे, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी संघ संपवला. भारतीय जनता पक्षही संपवला. झेंडाही संपवला. पण निवडणुकीसाठी चिन्ह लागते, ते चिन्ह फक्त ठेवलेले आहे. अशा परिस्थितीत पक्ष टिकले, तर देशाचा एकोपा टिकतो. त्यामुळे आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे. मानेवर बसलेले मोदींचे भूत उतरवायचे का? त्यांच्या मानेवर बसलेले भूत आम्ही उतरवायला निघालो आहोत. तेव्हा संघाने त्यात आम्हाला मदत करावी, असे आवाहन संघाला केले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने भाजपासोबत मॅच फिक्सिंग केली
राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंगच्या विधानाचा अर्थ वेगळा होता. इथे राज्यातील महाराष्ट्र काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपासोबत बसून मॅच फिक्सिंग केलेले आहे. राहुल गांधी यांनी हे विसरता कामा नये. नांदेड, भंडारा-गोंदिया या मतदारसंघात काँग्रेसने मॅच फिक्सिंग केले आहे. ठाकरे गटाने कल्याण मतदारसंघातही मॅच फिक्सिंग केली आहे. शरद पवार गटाचा रावेर मतदारसंघ हाही मॅच फिक्सिंगचा आहे. आणखी लिस्ट देऊ शकतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला. या निर्णयावर बोलताना, तुम्ही भाजपाचे नाव ऐकले का, बीजेपी पार्टी संपली आहे, तिथे आता मोदी पार्टी आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जो पाठिंबा दिला, तो बरोबर दिला. राज ठाकरेंनी मोदी पार्टीला पाठिंबा दिला. बीजेपी पार्टीला पाठिंबा दिलेला नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती.