Prakash Ambedkar News: नवीन कुणबी प्रमाणपत्र तपासले गेलेले नाहीत. ज्यांना दिले त्यांनी अर्ज केलेला नाही, तुम्ही स्वत:हून सर्च केले आहे. ज्यांनी घेतले नाही, त्यांनी ते सोडून दिले आहे, असे होऊ शकते. नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा. जे कुणबी आहे, ते अर्ज करतील आणि त्यांना आरक्षण मिळून जाईल, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली. राज्यात येत्या २५ जुलैपासून ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या हक्कांसाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. ही यात्रा दादर चैत्यभूमीपासून निघणार असून संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच ज्यांच्याकडे कुणबी आरक्षणाचे कागदपत्रे आहेत ते प्रशासनाकडे जातील आणि आपले कुणबी प्रमाणपत्र घेतील. पण प्रशासनाने स्वत: जाऊन सरसकटपणे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करणे चुकीचे आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सगेसोयरे ही भेसळ
सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची आहे. ते श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळूच नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. याचा तोडगा मी आता मांडणार नाही. पण आता भेसळ करण्याचा भाग सुरू आहे. सगे सोयरे ही भेसळ आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलन गरीब मराठ्यांचे आदोनल आहे. ते जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही. त्यांचे आंदोलन कुठे जाईल, कसे जाईल हे सांगता येत नाही. मराठ्यांना आरक्षण न देणे हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांचे आंदोलन भरकटले आहे, असे म्हटले नाही आणि म्हणणारही नाही. पण मनोज जरांगे पाटील यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. ते श्रीमंत मराठ्यांसोबत आहेत की, ३१ खासदारांसोबत आहेत की, गरीब मराठ्यांसोबत आहेत? याचा विचार करावा लागणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.