Maharashtra Politics: एकीकडे राज्यासह देशातील राजकीय वातावरण तापलेले असताना, दुसरीकडे सर्वच पक्ष आता २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच २०२४ हा भाजपचा सत्तेचा शेवटचा कालखंड असेल.उद्या जर पंतप्रझान मोदी यांनी राहुल गांधी यांना माझ्यामागे उभे राहा असे सांगितले तर राहुल गांधी त्यांच्यामागे उभे राहतील, असा मोठा दावा करण्यात आला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हा मोठा दावा केला आहे. राहुल गांधी तुम्ही माझ्या मागे उभे राहा. नाही तर तुरुंगाच टाकेल, असे पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांना म्हटले तर उद्या राहुल गांधी मोदींच्या मागे उभे राहतील. कारण त्यांनी व्यवस्थाच तशी केली आहे, माझ्या मागे उभे रहा, नाहीतर जेलमध्ये जा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. इथले लढे राजकीय लोक लढतील, असे समजू नका. हा लढा आपल्यालाच लढावा लागेल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
२०२४ हा भाजपसाठी सत्तेचा शेवटचा कालखंड असेल
२०२४ हा भाजपसाठी सत्तेचा शेवटचा कालखंड असेल. मोदी विरोधी बाकावर जातील, यासाठी आताच कामाला लागा. आम्ही मोहन भागवत यांना विचारतो की, तुम्हाला शस्त्र बाळगायचा परवाना आहे का? असेल तर दाखवा. यांना शस्त्र बाळगायचा अधिकार आहे का? एकतर आपण तरी पराभूत होऊ, नाहीतर ते तरी पराभूत होतील, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी चीनच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाही
५६ इंचाची छाती चीनमध्ये १४ इंचाची होते. संसदेच्या सभागृहात आणखी काही माणसे शिल्लक आहेत. ते मोदींना चॅलेंज करत आहेत. पण मोदी चीनविरुद्धच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाही. मोदी आणि चीनचे काय प्रेम आहे, माहिती नाही?, असा टोला आंबेडकर यांनी लगावला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या राजकीय आणि सामाजिक लढ्यात सहभाग नाही. जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्यांचे चारित्र्य हनन करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"