"प्रकाश आंबेडकर निमंत्रणाची वाट बघतायत, सोबत यायचयं तर खरगेंना भेटा, अडचण काय?"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 09:31 PM2024-01-18T21:31:01+5:302024-01-18T21:36:13+5:30

जर अवास्तव मागणी झाली आणि जागा उभ्या केल्या तर त्याचा फायदा मोदींना होतो. मी वेळोवेळी सांगतोय असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. 

Prakash Ambedkar is waiting for an invitation, if you want to come with INDIA Alliance, meet Kharge - Prithviraj Chavan | "प्रकाश आंबेडकर निमंत्रणाची वाट बघतायत, सोबत यायचयं तर खरगेंना भेटा, अडचण काय?"

"प्रकाश आंबेडकर निमंत्रणाची वाट बघतायत, सोबत यायचयं तर खरगेंना भेटा, अडचण काय?"

अमरावती - २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे ९ ठिकाणी काँग्रेसचे खासदार पडले आणि भाजपाचे निवडून आले हे वास्तव आहे. त्यामुळे असं काही प्रकाश आंबेडकरांनी करू नये. तुम्ही खरगेंना फोन केला तर तुम्हाला भेटायला कोण अडवणार आहे? तुम्ही कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहताय? असा थेट सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना विचारला आहे. 

वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करण्याबाबत पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, इंडिया आघाडी ही २८ पक्षांची आहे. त्या पक्षांनी मल्लिकार्जुन खरगेंना नेतृत्व दिले आहे. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीतील नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. जर त्यांना इंडिया आघाडीत यायचं असले तर त्यांनी खरगेंना भेटून सांगितले पाहिजे.एखादे पत्र दिले पाहिजे. पण ते कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहतायेत माहिती नाही. त्यांना मोदींना हरवायचं आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी पत्र लिहिले नाही. मी एक पत्र पाहिले जे त्यांच्या प्रवक्त्यांनी लिहिलं. स्वत: प्रकाश आंबेडकरांनी भेटायला काय हरकत आहे? ते नेते आहेत. २८ पक्षाचे नेते एकमेकांना भेटत आहेत. मग प्रकाश आंबेडकरांना भेटायला काय अडचण आहे? असं त्यांनी विचारले. 

तसेच प्रकाश आंबेडकर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करतायेत त्यामुळे त्यांची चर्चा संपली की आम्हाला कळेल. प्रकाश आंबेडकर हे देशातील नेते आहेत. देशात त्यांच्या एकट्याकडे आंबेडकर हे नाव आहे. प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाले पाहिजे. त्यांनी देशाच्या संसदेत आले पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मी मुख्यमंत्री असतानाही असा प्रयत्न केला होता. पण जर अवास्तव मागणी झाली आणि जागा उभ्या केल्या तर त्याचा फायदा मोदींना होतो. मी वेळोवेळी सांगतोय असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. 

...म्हणून मविआच्या जागावाटपाला विलंब

तिन्ही पक्षांची चर्चा सुरू आहे. बाकी दोन्ही मित्रपक्षात फाटाफूट झालीय. त्यांची मते, २०१९ ची ताकद, नेते कोण आहेत याचे आकलन करायला आता वेळ लागतोय. त्यामुळे मागच्यावेळी भलेही शिवसेनेची जागा निवडून आली असेल परंतु त्यात शिंदे गट होता, भाजपा होता. आता हे दोन्ही नसताना त्यांची ताकद किती आहे याची चर्चा करावी लागेल म्हणून जागावाटपाला उशीर होत असल्याचं चव्हाणांनी सांगितले. 

भाजपाचा आत्मविश्वास ढळलाय, त्यामुळे नेते फोडतायेत

भाजपाचा आत्मविश्वास ढळलेला आहे. २०१४, २०१९ ची धोरण मांडले ते फसले. त्यामुळे एकामागोमाग एक पक्ष फोडून, ईडी, सीबीआयचा दबाव वापरून नेते फोडण्याचा प्रयत्न आहे. २०२४ ची निवडणूक ही सोपी नाही हे भाजपाला कळाले आहे. त्यामुळे आणखी कुणी हाताला लागतंय का? ईडी, सीबीआयचा वापर करून कुणी फुटतंय का हे पाहतायेत. कसल्याही परिस्थितीत भाजपाला निवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे निवडणूक आपल्या हातातून चालली असल्याने भाजपा नेते फोडत आहे. नेते कुठे गेले तरी कार्यकर्ते आणि मतदार कुठे आहेत हे महत्त्वाचे आहे. ज्या कार्यकर्त्यांनी विचाराला धरून मतदान केले. जातीयवादाविरोधात मतदान केले आहे. त्यामुळे नेते त्या पक्षात गेले म्हणून मतदार बदलतील असं नाही. ज्या महाराष्ट्रातील जनतेने एका विचाराने मतदान केले. तो विचार ते सोडणार नाही. जे गेले ती वस्तूस्थिती आहे. काही स्वार्थाकरता तर काही भीतीपोटी गेलेत. मात्र मतदार गेलेत की नाही हे निवडणुकीतून स्पष्ट होईल. स्थानिक संस्थांच्या निवडणूक घेण्याचे धाडस भाजपाचे होत नाही. त्यावर आपल्याला काय समजायचे ते समजायला हवे. लोकांना विकत घेता येता, पैशासाठी मते विकत घेता येतात हा भाजपाचा गैरसमज आहे. नेते विकत घेतले तरी कार्यकर्ते, मतदार जाणार नाहीत ही माझी खात्री असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

Web Title: Prakash Ambedkar is waiting for an invitation, if you want to come with INDIA Alliance, meet Kharge - Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.