Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न, महागाईल, बेरोजगारी यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. मात्र, महाविकास आघाडीत सामील होऊ इच्छिणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या महामोर्चात सहभागी झाले नव्हते. यावर आंबेडकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपवर मीच जास्त टीका करतो. चाळीस वर्षे राजकारणात आहे, पण डाग नाही. सगळे डागळलेले आहेत. भाजपचा सामाजिक आणि राजकीय लढ्यात सहभाग नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सिम्बॉल्स नाही, त्यामुळे जे सिम्बॉल्स आहे, त्याला काळे फासण्याचे काम सुरू आहे, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी का झाले नाही?
महाविकास आघाडीच्या महामोर्चावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हा मोर्चा महाविकास आघाडीचा आहे. आम्हाला घ्यायला मतभेद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला घ्यायला विरोध आहे. त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंध येत नाही. आम्हाला सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचे नाही. हा मोर्चा शिवसेनेचा आहे, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. उद्धव ठाकरे यांनी फक्त असे कळवले होते की, आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचा विचार करू. पण, अजित पवार म्हणाले की, हा प्रश्न अजून विचाराधीन आहे. याचाच अर्थ नाही असा होतो, असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
दरम्यान, सीमावाद प्रकरणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोषी आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या सोबत जाण्यास तयार आहोत. पण राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासोबत जाण्यापेक्षा एकटे लढू, भाजपासोबतही आम्ही जाणार नाही. आता अविकसित गावे शिवसेनेवर आरोप करण्याची शक्यता आहे. कारण ते राष्ट्रवादीचे नाकर्तेपण आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे शिंतोडे शिवसेना आपल्यावर का उडवून घेत आहे? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"