मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राज्यासह देशातील अनेक पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने देखील महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरवात करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.
राज्यातील लातूर, सातारा, बीड आदी जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर दौरा करणार आहेत. उद्या प्रकाश आंबेडकर लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी सातारा दौरा, 11 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याचा दौरा तर 28 ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात त्यांचा दौरा असणार असून ग्रामीण महाराष्ट्रापासून शहरी भागापर्यंत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते आहे.
वंचित बहुजन आघाडीने काही महिन्यांपूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटासोबत युती केली. मात्र, महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी देखील येत्या निवडणुकांमध्ये रणशिंग फुंकणार असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी जाहीर सभा, मेळावे, मोर्चे घेऊन पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे.
आगामी लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष सक्रिय झाले असून राजकीय, सभा मेळावे जोरदार सुरु आहेत. राज्यातील सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिंदे गट, शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडीसह सर्वच पक्षांनी राज्यातील विविध भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केली आहे.