सांगली: कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्ला चढवला. कोरेगाव-भीमा येथील दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील वातावरण पेटवले, असा थेट आरोपही त्यांनी केला. कोरेगाव-भीमा दंगलीनंतर एकबोट आणि मला अटक करण्याची मागणी केली जात आहे. हा म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. मुळात या सगळ्या दंगलीची सूत्रधार ही एल्गार परिषद आहे. एल्गार परिषदेकडून शनिवारवाड्यासमोर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उमर खालिदला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा हेतू मुळात कोरेगाव-भीमामध्ये दंगल घडवणे, हाच होता. त्यामुळे सरकारने एल्गार परिषदेच्या नेत्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली.
कोरेगाव भीमा ‘बंद’मधील गुन्हे सरकार मागे घेणार, १३ कोटींची नुकसानभरपाईतसेच सध्या माझ्यावर आरोप होत असताना सर्वच राजकीय पक्ष राजकीय स्वार्थासाठी गप्प बसले आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे दलितांना खुश ठेवता यावे, त्यांची मते मिळावीत, यासाठी राजकीय पक्षांकडून कोरेगाव-भीमा प्रकरणाचा वापर सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील माझ्यावर तारतम्य सोडून आरोप केले. एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देऊन त्याला पढवून बोलायला लावले जाते, तसे प्रकाश आंबेडकरांचे वर्तन आहे. मी गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये कोरेगाव-भीमा परिसरात फिरकलेलो नाही. त्यामुळे मला अटक करून काय साध्य होणार? परंतु, प्रकाश आंबेडकरांना माझ्या अटकेची मागणी करून आपण सत्याचा पुरस्कार करतोय, असे वाटत आहे. सर्वप्रथम आंबेडकर यांनी कोरेगाव-भीमा दंगलीच्यावेळी त्याठिकाणी होते, ही माहिती कोणी दिली, त्यांची नावे उघड करावीत. सरकारनेही त्यांची चौकशी करावी, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.