Prakash Ambedkar News: देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. माझी नरेंद्र मोदींकडून त्याबाबत खूप अपेक्षा आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले. शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी आपला निर्णय घोषित केला. मनसे लोकसभेची निवडणूक लढणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयावर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होऊ शकला नाही. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर प्रचाराला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी खरमरीत शब्दांत टीका केली.
भाजपा संपली, राज ठाकरेंनी मोदी पार्टीला पाठिंबा दिला
प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना राज ठाकरे यांच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारला. यावर, तुम्ही भाजपाचे नाव ऐकले का, बीजेपी पार्टी संपली आहे, तिथे आता मोदी पार्टी आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जो पाठिंबा दिला, तो बरोबर दिला. राज ठाकरेंनी मोदी पार्टीला पाठिंबा दिला. बीजेपी पार्टीला पाठिंबा दिलेला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतील असे वाटले होते. पण ते शक्य झाले नाही. प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरीही आम्ही उत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी संविधान रक्षणासाठी दिलदारी दाखवायला हवी. भविष्यात काय होते पाहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही निवडणूक लढवत आहोत. त्यांनी त्यांची निवडणूक लढवावी. आम्ही आमची निवडणूक लढवतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.