Prakash Ambedkar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचामहाविकास आघाडीत समावेश होणार नाही, असेच चित्र आहे. वंचितने अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. तर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. यातच भाजपाला तगडी टक्कर केवळ वंचित आघाडीच देऊ शकते, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीची दखल देशपातळीवर घेतली जात आहे. आधी वंचितला कुणी विचारत नव्हते. आता मात्र वंचितविषयी चर्चा आहे. भाजपाला टक्कर देण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीमध्येच आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
ठाकरे गट आणि शरद पवार गटाने स्वतःमध्ये बदल करावेत
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातील बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाल्याचे प्रकाश आंबेडकरांनी आता जाहीर केले आहे. आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला, असे आंबेडकर म्हणाले.