Prakash Ambedkar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या तयारीला, बैठकांना, चर्चांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आता तिसऱ्या आघाडीचा पर्याय राज्यातील जनतेसमोर येणार आहे. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी एकत्रित येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकतात, अशा चर्चा आहेत. यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ११ जागांवर उमेदवारी यादी जाहीर केली आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. परंतु, आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे. पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचे म्हटले आहे.
शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते हे स्पष्टच
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच कोणते उमेदवार पाडणार, याची यादीच जाहीर करणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार नसतील, तर ते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर आंदोलन चालवत होते, हे व्हेरी क्लियर्ड झाले. मराठा नेते म्हणजे शरद पवार, अशी चर्चा ओबीसींमध्ये सुरू आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी भूमिका लवचिक नाही. त्यामुळे मराठा समाजाचे नुकसान होत आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळेल, असे आम्हाला वाटत नाही. कारण परिस्थितीच तशी आहे. म्हणूनच ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणाची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. गरीब मराठा, रयतेतील मराठा यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही. दोनवेळेस न्यायालयाने फेटाळले आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी संविधानिक नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.