Prakash Ambedkar On MVA: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चितपट केल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडीत नवचैतन्य आल्याचे बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यातच आता यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे.
विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढल्याशिवाय भाजपाचा पराभव करणे अशक्य आहे. असा पराभव अपेक्षित असेल तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेऊन जाण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तुम्हाला महाविकास आघाडीत घेण्याची जबाबदारी माझी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे ती गोष्ट आम्ही त्यांच्यावर सोडून दिली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
राष्ट्रवादी सेटल होत नाही तोवर जागावाटप शक्य नाही
ईडी व नाबार्डच्या चौकशीखाली असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भाजप राजकारण करेल. तेथे काय गेम होतो ते खूप महत्वाचे आहे. राष्ट्रवादीचे काही लोक स्वेच्छानिवृत्ती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.
दरम्यान, शिवसेना पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. त्यांना गट म्हणून लढता येईल. पण ते पक्ष नोंदणी करायला गेले तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पक्षाचा व्हीप चालेल, असे जे मान्य केले आहे, त्यात नुकसान होईल. शेवटी शिवसेनेला नवे चिन्ह घेऊन लढावे लागेल. या सर्व परिस्थितीत राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला फायदा होताना दिसत नाही. एकूणच एकीत बिघाडी करण्याचे भाजपचे राजकारण सुरू आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.