वाद पेटला! नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर आंबेडकर संतापले; भाजपबाबत केला गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 09:42 PM2024-03-31T21:42:25+5:302024-03-31T21:45:54+5:30
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे.
Congress Nana Patole ( Marathi News ) : वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही स्वबळाचा नारा देत अनेक मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सात मतदारसंघांमध्ये मात्र वंचितकडून काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. असं असताना वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नसून आज पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी पटोले यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.
वंचितने नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, नागपूरमध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी वंचितने हा निर्णय घेतला आहे. त्यावर पलटवार करताना प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध असल्यानेच त्यांना नितीन गडकरी यांच्या पराभवाचं दु:ख होणार आहे, असा हल्लाबोल आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांना पक्षनेतृत्वाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास कशामुळे नकार दिला, हे आज समोर आलं आहे, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.
आंबेडकरांविरोधातील उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी पटोले उपस्थित राहणार?
वंचित आघाडीने नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला असून काँग्रेसने सुचवलेल्या आणखी पाच मतदारसंघांमध्येही वंचितकडून काँग्रेसला पाठिंबा दिला जाणार आहे. मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष होण्यास नकार दिलेल्या वंचित आघाडीला अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाणार नसल्याचे समजते. अकोला लोकसभा मतदारसंघातून स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. डॉ. अभय पाटील हे काँग्रेस पक्षाकडून ४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं बोललं जात आहे. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील उपस्थित राहू शकतात.