Prakash Ambedkar : "आता काँग्रेस, राष्ट्रवादीला दुय्यम स्थान द्या"; बोचरी टीका करत आंबेडकरांचं विरोधकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 02:57 PM2022-07-17T14:57:28+5:302022-07-17T15:13:41+5:30
Prakash Ambedkar : काँग्रेसचं आतापर्यंतचं राजकारण दिवाळखोरीचं राहिलं आहे. अक्कलशून्य असा काँग्रेस पक्ष झाला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहंसमोर पक्ष झोपला आहे अशी बोचरी टीकाही आंबे़डकरांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आता विरोधकांना आवाहन केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा भाजपाला पर्याय होऊ शकत नाही. 2024 च्या निवडणुकीत आघाडी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम स्थान द्या. तरच भाजपाला आपण हरवू शकतो. ममता बँनर्जी, नवीन पटनाईक, चंद्रशेखर राव, स्टॅलिन यांनीही त्याचा विचार करावा, असं प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं आहे. काँग्रेसचं आतापर्यंतचं राजकारण दिवाळखोरीचं राहिलं आहे. अक्कलशून्य असा काँग्रेस पक्ष झाला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहंसमोर पक्ष झोपला आहे अशी बोचरी टीकाही आंबे़डकरांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. माझ्याकडे एकही मतं नाही. मात्र द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा मिळेल. कारण 70 वर्षानंतर आदिवासी देशाचा राष्ट्रपती होतो आहे. त्यामुळे त्यांना सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा. काँग्रेसने आदिवासी उमेदवार द्यायला हवा होता असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. टिव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा आदिवासी असावा, असं मी आधीच विरोधकांना कळवलं होतं. पण त्यांनी माझं ऐकलं नाही.काँग्रेसने अक्कलशून्य कारभार केला. भाजपाने आदिवासी उमेदवार दिला. तो आपल्याला देता आला नाही. हे मान्य करायला हवं होतं. पण तेवढी दानत काँग्रेसकडे नाही" अशा शब्दांत आंबेडकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी याआधी दिला होता. राष्ट्रपती निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले होते की, "यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी आमची विनंती आहे. कारण अनेक पक्षांच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या सदस्यंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे."