मुंबई - आमचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी आहे असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्याचसोबत बघायचं एकाकडे आणि हात द्यायचा दुसऱ्याला असं मी करत नाही म्हणत आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझा विश्वास कुणावर नाही असं नाही. जिथे जुळायचं असते तिथे १०० टक्के जुळले पाहिजे. बघायचं लेफ्टकडे आणि हात टाकायचा राईटकडे अशी जी व्यवस्था असते ती मला चालत नाही. मी महाविकास आघाडीचा अद्याप भाग नाही आणि माझी होण्याचीही इच्छा नाही. माझी युती शिवसेनेशी आहे. शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे हा त्यांचा प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच महाविकास आघाडीचा आमचा काही संबंध नाही. त्यामुळे निर्णयाचा संबंध नाही. मी कुणाच्या निर्णयाची प्रतिक्षा करत नाही. २०२४ विधानसभा निवडणुकीपर्यंत ज्या निवडणुका येतील त्या सगळ्या ठाकरे शिवसेना आणि आम्ही एकत्रित लढणार आहोत. ज्याने त्याने कोण कोणासोबत आहे हे पाहावं. मैत्री करायची तर ती प्रामाणिक करायचा. समझौता करायचा तर प्रामाणिक करायचा. समझौता करायचा नसेल तर करू नये. प्रत्येकाने आपापली भूमिका घ्यावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
ही युती म्हणते वंचित सोबत किंचित“प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबत उद्धव ठाकरे यांच्या शिल्लकसेनेची युती म्हणजे. वंचित सोबत किंचित,” असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या युतीवर टीकेचा बाण सोडला.
वेळ आल्यावर जागा वाटपाचा निर्णय : उद्धव ठाकरेवंचित व शिवसेना जागा वाटपाच्या निर्णयाबाबत बोलताना अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. हिंमत असेल तर निवडणुका घ्याच, असे आव्हान देत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. वेळ आल्यावर कोणत्या जागा लढवायच्या तोही निर्णय घेऊ. दोघांची पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी काय करता येईल, या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल, असंही ते म्हणाले.