प्रकाश आंबेडकरांना सायंकाळी ७ पर्यंतची वेळ?; अन्यथा मविआ एकाचवेळी ४८ उमेदवार जाहीर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 08:53 AM2024-03-19T08:53:31+5:302024-03-19T11:01:56+5:30
मविआने प्लॅन बी देखील तयार ठेवला असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. वंचितने देखील स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाली, भाजपाची पहिली यादी आली तरी देखील मविआचे काहीच ठरत नाहीय. वंचितने चारपैकी दोन जागाचा प्रस्ताव त्या हरणाऱ्या असल्याचे सांगून फेटाळला आहे. तसेच नवीन प्रस्ताव पाठवा असे सांगितले आहे. परंतु, मविआने अद्याप काही नवा प्रस्ताव दिलेला नाहीय. वंचितला सोबत घेऊन लढायचे की नाही यावर आता निर्णय घेण्याची मविआवर वेळ आली आहे. कारण उमेदवार जाहीर करून त्यांना निवडणुकीच्या तयारीला देखील वेळ लागणार आहे. अशातच विलंब झाला तर हातच्या जागाही जायच्या अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे. यामुळे मविआने आज सायंकाळपर्यंत काय ते सांगा, असा संदेश वंचितला पोहोचता केला असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्यावेळी वंचित वेगळी लढल्याने काँग्रेसच्या बऱ्याच जागा गेल्या होत्या. मतांची विभागणी झाल्याने त्याचा फायदा शिवसेना-भाजपला झाला होता. यामुळे यावेळी वंचितला सोबत घेऊन लढण्याची तयारी मविआने केली होती. परंतु वंचितने जास्त जागा मागितल्याने घोडा अडला होता. आता आज सायंकाळपर्यंत वंचितने नाही कळविले तर मविआ आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या हवाल्याने एबीपीने वृत्त दिले आहे.
मविआने प्लॅन बी देखील तयार ठेवला असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. वंचितने देखील स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. यामुळे या दोन्ही बाजुंची आघाडी झाली नाही तर त्याचा थेट फायदा भाजपा-शिवसेनेला होणार आहे. राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी मविआ एकाचवेळी ४८ जागांवरील उमेदवार जाहीर करणार असल्याचे म्हटले होते.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार आहे. वंचित नाही आली तर उद्धव ठाकरे शिवसेना २२, काँग्रेस १६ आणि शरद पवार राष्ट्रवादी १० अशा जागा वाटून घेतल्या जाणार आहेत. जर वंचित आली तर ठाकरे २०, काँग्रेस १५, शरद पवार राष्ट्रवादी ९ आणि वंचितला ४ अशा जागा दिल्या जाणार आहेत. तसेच हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना मविआ पाठिंबा देणार आहे. माढ्याची जागा जानकरांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या दोन जागा त्या त्या पक्षांच्या कोट्यातून दिल्या जाणार आहेत.
महाविकास आघाडीने कुठलेही अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीला दिलेले नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. अशी कुठलीच चर्चा महाविकास आघाडीने आमच्याशी केलेलं नाही, असे वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.