एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 02:51 PM2019-08-18T14:51:01+5:302019-08-18T15:15:28+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत माजी खासदार प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असुद्दिन ओवेसी यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना करत निवडणूक लढवली. मात्र औरंगाबाद वगळता कुठेही त्यांना आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. विशेष म्हणजे खुद्द प्रकाश आंबेडकर यांचा अकोला आणि सोलापूर दोन्ही ठिकाणाहून पराभव झाला. औरंगाबाद वगळता इतरत्र मुस्लीम समाजाची मते कमी प्रमाणात मिळाली, त्यामुळे आपला आणि वंचित बहुजन आघडीच्या उमेदवारांचा पराभव झाला असल्याचा दावा आंबडेकर यांनी केला होता. तर आता विधानसभेत सुद्धा याची पुनरावृत्ती होण्याची चिंता आंबडेकर यांना असल्याची बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेल्या वंचित आघाडीला प्रत्यक्षात मात्र, अपेक्षाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे खुद्द आंबेडकर यांचा दोन्ही ठिकाणाहून पराभव झाला होता. तर, मुस्लीम समाजाने औरंगाबाद वगळता बाकी ठिकाणी वंचित आघीडला मतदान केलं नसल्याचा खुलासा आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा मुस्लीम मते मिळाली नाही तर, वंचित आघाडीला राज्यात खात उघडणे सुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळे सद्या प्रकाश आंबेडकर मुस्लीम भागात विविध कार्यक्रमातून संपर्क साधताना दिसत आहे.
आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग मुस्लीम समाजात आहे. सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीत याच मुस्लीम समाजाने वंचित बहुजन आघाडीपेक्षाकाँग्रेसला मोठी पसंती दिली. त्यामुळेच आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे एमआयएम सोबत असूनही मुस्लीम मते मिळत नसल्याने आंबेडकर यांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे.
शनिवारी आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मुस्लीम समाज भव्य प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भाजपपेक्षा थेट काँग्रेसवर जोरदार टीका केली. आजच्या परिस्थितीत काँग्रेस हा पक्ष भाजप-शिवसेनेला पराभूत करू शकत नाही. मात्र जर मुस्लीम समाज हा वंचित सोबत आला तर नक्कीच राज्यात युती सरकारला घरी बसवणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.