Prakash Ambedkar Chhagan Bhujbal : गेल्या काही महिन्यांपासू राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाने राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतली आहे. तर, ओबीसी कोट्यातूनच आरक्षण घेणार, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मांडली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) छगन भुजबळांना एक सल्ला दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, 'ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या आधी त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला आहे. ओबीसी पक्ष काढत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. पण, छगन भुजबळ यांना आमचा सल्ला आहे की, आपण या ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे.'
'पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक राजकीय त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो', असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. आता यावर छगन भुजबळ काय बोलणार, हे पाहणे महत्वाचे असेल.
ओबीसी पक्षाची घोषणाओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी नव्या ओबीसी पक्षाची घोषणा केली आहे. अलीकडेच मुंबईत ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी म्हटले की, राज्यात भटके विमुक्त आणि ओबीसींची संख्या 60-65 टक्क्यांच्या आसपास आहे. तरीही भटक्या विमुक्त समाजाच्या आमदारांना पाडण्यात येत होते. मराठा खासदार, आमदार सर्वाधिक आहेत. घटनेने दिलेल्या अधिकारातही आम्हाला वाटा घेऊ दिला नाही. त्यामुळे आम्ही सत्तेपासून वंचित राहिलो. म्हणून आम्हाला पक्ष स्थापन केल्याशिवाय पर्याय नव्हता. 15 जणांची समिती नेमली आहे. पक्षाचे नाव, घटना याबाबत अभ्यास करणार आहे. ही लढाई लढण्याची आमची इच्छा नव्हती, परंतु 75 वर्षे आमच्या वाट्याला जे आले, त्यामुळे आम्ही रणशिंग फुंकले आहे. आमच्याकडे पैसा, साधने नाहीत पण लोकशक्ती आहे. आमच्या पक्षाकडे 60 टक्के मतदार आहेत असं त्यांनी सांगितले.