- सुरेंद्र राऊत यवतमाळ : अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचित बहुजन आघाडी स्थापन करून नवीन राजकीय प्रयोग केला. मात्र, या आघाडीमुळे बहुजन समाजच सत्तेपासून वंचित राहणार आहे. या आघाडीचा थेट लाभ भाजपा-शिवसेना महायुतीला होणार असल्याचा आरोप रिपाइंचे (ए) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
आठवले यवतमाळात मुक्कामी होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. आठवले म्हणाले, आमचा युतीला उघड पाठींबा आहे. तर आंबेडकर छुप्या पद्धतीने युतीची मदत करीत आहेत. रिपाइं आठवले गटाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवाराचा तन-मन-धनाने प्रचार करणार आहे. यवतमाळात प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालीच विदर्भातील नाराज रिपाइं पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात त्यांनी मान-सन्मान मिळत नसल्याने महायुतीत राहण्याबाबतचा फेरविचार केला जावा, अशी मागणी केली.
याकडे आठवलेंचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या सर्व नाराज रिपाइं कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून नाराजी दूर केली जाईल. रिपाइं कार्यकर्ते प्रतिकुल परिस्थितीतही एकदिलाने काम करतील. वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे मत विभाजन अटळ आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मतेच ‘मायनस’ होणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.