मुंबई : प्रकाश आंबेडकर यांची जे केले ती त्यांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती. आंबेडकर हे विरोधकांची मते फोडण्याचा, विभागण्याचा प्रयत्न करतायत. लोक त्यांचे काय गणित आहे काय रणनीती आहे, हे ठरवतील. आंबेडकर हे भाजपाची बी टीम असल्याचे कळेलच, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची फेसबुकवर लाईव्ह मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध मुद्यांवर परखड भाष्य केले.
कसल्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. या निवडणुकीत काँग्रेस नेतृत्वाखालचे आघाडी सरकार येईल. काँग्रेस पक्षाने एक व्यापक भुमिका घेतलेली आहे. आम्हालाच सत्ता पाहिजे असे म्हटलेले नाही. भाजपाला आमच्या चुकांमुळे चुकुन यश मिळाले. सोशल मिडियाचा आता आम्हीही प्रभावी वापर करत आहोत. पुढील सरकार विरोधकांचे सरकार असेल आणि काँग्रेस मोठा पक्ष असेल. भाजपाने आता कितीही आम्हाला देशद्रोही म्हटले, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे केला, तरीही आता लोकांना कळलेले आहे की 'दाल मे कुछ काला है'. यामुळे नोटबंदी, युवकांच्या नोकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न, जीएसटी, विकासदर या प्रश्नांवर भाजपाला घेरणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
Exclusive : 'संभाजी भिडेंचे विचार बहुजन समाजाला मारक; त्यांच्यावर गुन्हेगारी कारवाईच हवी'
तसेच प्रचारामध्ये महत्वाचा प्रश्न म्हणजे सुरक्षेचा प्रश्न असणार आहे. खरं काय झाले ते सांगा, खरंच दहशतवाद्यांना नामोहरम केले का, दाखवा. जर केले असेल तर आम्ही स्वागत करू. जनतेमध्ये विश्वास जागवा. परंतू आता राफेलवरून कोणीही तुमचा बचाव करू शकणार नाही. तुम्हाला उत्तरे द्यावीच लागतील, आता दिली नाही तर मतपेटीद्वारे जनता निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.