कोल्हापूर : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे यांनी बुधवारी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
प्रकाश आवाडे यांनी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीमाना देत इचलकरंजीतून अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. भाजपने काश्मीर मधील कलम ३७० बाबत घेतलेल्या भूमिका कॉँग्रेस नेतृत्वाने केलेला विरोध चूकीचा असल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे आवाडे यांनी सांगितले.प्रकाश आवाडे म्हणाले, भाजप सरकारने घेतलेल्या ३७० कलमाचे स्वागत आपण इचलकरंजी कॉँग्रेस कमिटीत केले होते. कॉँग्रेसची सध्याची भूमिका आणि इचलकरंजीचे राजकारण पाहता, आपण येथे राहू नये,यासाठी गेली दोन - तीन महिने कार्यकर्त्यांचा दबाव होता.
कॉँंग्रेस पासून दूर जाऊन अपक्ष लढल्यास १०० टक्के यश मिळणार असे कार्यकर्त्यांचे मत आहे. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर कॉँग्रेस सोडण्याचा आम्ही निर्णय घेतला.
पक्षात राहून काही मते मांडताना बंधने येतात, त्यामुळेच कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. इतर पक्षात जाण्याचा सध्यातरी विचार नाही. अपक्ष म्हणूनच इचलकरंजीतून निवडणूकीला सामोरे जाणार आहे.