सावंतवाडी : नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या कारणावरून भाजपाचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तो न स्वीकारता फाडून टाकत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदूर्गमध्ये आले होते. जठार यांनी कालच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला होता. राजकीय भांडणामुळे नाणार प्रकल्प रद्द झाला. यात कोकणचे पुढील पन्नास पिढ्यांचे नुकसान झाले. कोकणवासीयांनी कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्ग, धरण प्रकल्प आदी विकास कामांना जमिनी दिल्या. त्याचा फायदा जगाला झाला. पण कोकणात रोजगार निर्माण झाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
आज दुपारी जठार यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात राजीनामा सोपविला. मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा फाडून टाकत एकेकाळचे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे नेते राजन तेली यांच्या खिशात टाकला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे सर्वांना कोडे पडले असून तेलींच्या खिशात राजीनामा टाकण्याचे कारण काय, असा प्रश्न जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जठार यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करत तुमचे रोजगार उपलब्ध करण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.
जठार सोमवारच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले, पर्यावरणाची हानी, प्रदूषण आदी कारणांमुळे प्रकल्प रद्द झाला असता तर ते आम्ही समजू शकलो असतो. त्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ यांना घेऊन रिफायनरी कंपनीने पानीपत दौरा केला. तेथील रिफायनरी दाखवली. तेव्हा कोणतेही प्रदूषण अथवा निसर्गाची हानी झाली नसल्याचे लक्षात आले. परंतु याबाबतची कोणतीही माहिती न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला ही चुकीची घटना आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाकडून ही अपेक्षा नव्हती. जठार म्हणाले, चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्गात येत आहेत. त्याचवेळी आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहोत. तसेच पुढील भूमिका नंतर जाहीर केली जाईल असे ते म्हणाले होते.