मुंबई - लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक लढवल्याने, मतांचे विभाजन झाले आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीत जर वंचितने स्वबळावर लढवण्याचे ठरवले तर, याची पुनरावृत्ती सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यामान आमदार असलेल्या प्रणीती शिंदे यांच्या मतदारसंघात होण्याची चर्चा पहायला मिळत आहे. एकीकडे 'वंचित'चे आव्हान तर दुसरीकडे पक्षातून मुस्लीम उमेदवाराला सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी. यामुळे शिंदे कुटुंब दुहेरी संकटात सापडले आहे.
२०१४ मध्ये सोलापूर शहर (मध्य) विधानसभा मतदारसंघात प्रणीती शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांना ४६ हजार ९०७ मते मिळाली होती. मात्र याच मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे शेख तोफिक यांना मते मिळाली होती. तसेच गेल्यावेळी एकटी लढलेल्या एमआयएम सोबत आता प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद असणार आहे. त्यामुळे प्रणीती यांच्यासमोर वंचितचे मोठे आव्हान असणार आहे.
त्यातच आता काँग्रेसचे माजी महापौर यू.एन.बेरिया आणि काँग्रेस मानवाधिकार सेलेचे सेलचे प्रदेश महासचिव ईशितयाक जागीरदार यांनी सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघातून काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. मुस्लीम समाजाचा हा हक्काचा मतदारसंघ असून, आजपर्यंत त्यांनी काँग्रेसलाच मतदान केले आहे. त्यामुळे यावेळी मुस्लीम उमेदवार द्यावा अशी मागणी जागीरदार यांनी केली आहे. तर प्रणिती शिंदे यांची उमेदवारी दुहेरी संकटात सापडली असून, सुशीलकुमार यावर काय मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत वंचित बहुजन आघाडी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र पुढे जागावाटपाच्या कारणावरून वंचित आघाडीने स्वबळावर निवडणुका लढवल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खुद्द प्रकाश आंबडेकर रिंगणात उतरले होते. त्यामुळे दलित-मुस्लीम मतांचे विभाजन झाले आणि शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. आता याची पुनरावृत्ती प्रणीती यांच्या सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघात होऊ शकते अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकरणात पहायला मिळत आहे.