मुंबई : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना बुधवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. नरसय्या आडम यांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. याचिकेनुसार, शिंदे यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी मतदानाच्या दिवसापूर्वी मतदारांना पैसे वाटले. निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रतिनिधींना रंगेहाथ पकडले आहे. तर सोलापूरच्या विडी कारखान्यात त्यांचे प्रतिनिधी कामगारांना पैसे देत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी या काळात शिंदेंच्या प्रतिनिधींकडून एकूण आठ लाख रुपये जप्त केले आहेत. तर प्रणिती शिंदे यांनी ही याचिका फेटाळण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. प्रणिती यांच्या म्हणण्यानुसार, याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही सबळ पुरावे सादर केलेले नाहीत. त्यामुळे ही याचिका रद्द करावी. न्या. आर. एम. सावंत यांनी प्रणिती शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आडम यांनी केलेली निवडणूक याचिका रद्द केली. याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप अस्पष्ट आहेत. असे सांगत ही याचिका फेटाळणे योग्य आहे, असे म्हणत हायकोर्टाने प्रणिती शिंदे यांना दिलासा दिला. (प्रतिनिधी) पैसे वाटल्याचा आरोपप्रणिती शिंदे यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना पैसे दिले, भ्रष्टाचार करून प्रणिती निवडून आल्याने त्यांची निवडणूक रद्द करावी आणि त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी भ्रष्टाचार केल्याचे जाहीर करावे, अशी मागणी नरसय्या आडम यांनी याचिकेद्वारे केली होती.
प्रणिती शिंंदे यांना हायकोर्टाचा दिलासा
By admin | Published: March 10, 2017 1:38 AM