मुंबई : मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने जेसीबी लावून पाडली आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमी कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना पाहायला मिळत असून, अनेक राजकीय नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. तर राज्यात काँग्रेससोबत असलेल्या शिवसेनेवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी निशाणा साधला आहे.
आधी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आता छत्रपती शिवाजी महाराज, सत्तेसाठी शिवसेना किती लाचार आहे. तर मध्यप्रदेशमध्ये झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातली जनता कधीच विसरू शकणार नाही. तर शिवसेना ह्याचा जाब काँग्रेसला विचारणार आहे का? असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला आहे. तसेच अशी घटना घडत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत कुठे गेले आहेत, असेही लाड म्हणाले.
तर छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे JCBने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले ते प्रकार अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी झाल्या प्रकाराबद्दल सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे,असे ट्विट करत उदयनराजे म्हणाले आहेत.