कोल्हापूर - इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या चौकशीत वारंवार पश्चात्ताप व्यक्त करीत आहे. अनावधानाने चूक झाल्याचे सांगत असला, तरी न्यायालयात मात्र याबद्दल मौन बाळगत आहे. पसार काळात त्याने वापरलेल्या कार पोलिसांनी नागपुरातून जप्त केल्या, तसेच १७ ते २४ मार्चच्या दरम्यान त्याला खर्चासाठी दीड लाखाची रोकड कोणी दिली, याचीही माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
कोरटकर याने पसार काळात नागपूर, चंद्रपूर, बैतूल, हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर आणि करीमनगर (तेलंगणा) येथे वास्तव्य केले. यासह तो वावरलेल्या एकूण १८ ठिकाणांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नागपुरात गेलेल्या पथकाने कोरटकर याची एक आलिशान कार जप्त केली, तसेच त्याचा मित्र मटका बुकी धीरज चौधरी याचीही कार जप्त केली.