ठाणे: केंद्र आणि राज्याच्या संघर्षात काही लोकप्रतिनिधींचा बळी जात आहे. त्यामध्ये मीही एक आहे, असे वक्तव्य ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बोलताना केले. मी कुठेही गायब झालो नाही. ईडीचे ससेमिरा चालू असून त्यात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. काही कारणास्तव मी काही दिवस दिसलो किंवा भेटू शकलो नाही. त्याचे विरोधकांनी मोठ्या प्रमाणात भांडवल केल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
तसेच शनिवारी ठाण्यातील लोकमान्य नगर येथील निर्मलादेवी चिंतामणी दिघे रूग्णालयात आमदार सरनाईक यांच्या हस्ते दोन कार्डियाक रूग्णवाहिकांसह दोन मोक्षरथाचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे भाजपला सरनाईक यांनी चांगली चपराख दिली आहे.
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आमदार निधीतून १ कोटी रूपये खर्चून कार्डियाक रूग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा शनिवारी ठाण्यातील लोकमान्य नगर येथील निर्मलादेवी चिंतामणी दिघे रूग्णालयात आयोजित केला होता. त्यावेळी बोलताना, त्यांनी केंद्र आणि राज्याच्या संघर्षात आपला बळी गेल्याचे वक्तव्य केले. माझ्या विरोधात विरोधकांनी कितीही षडयंत्र रचले तरी मी, माझे कुटुंब आणि कार्यकर्त्यांचे काम हे चालू आहे. भविष्यात ही सुरू राहील असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेविका परिषा सरनाईक, युवा सेना सचिव-नगरसेवक पुर्वेश सरनाईक, लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्षा आशा संदिप डोंगरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. दिनेश शेंदारकर, डॉ. वैशाली पालांडे, डॉ. अतुल जाधव, डॉ. निगम, विभागप्रमुख रामचंद्र गुरव, सामाजिक कार्यकर्ते संदिप डोंगरे, भगवान देवकाते, यावेळी शिवसेना महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
अशी आहे कार्डियाक अँब्युलन्स
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता कार्डियाक अँब्युलन्स मध्ये लहान मुलांना लागणारे ऑक्सिजन सिलेंडर तसेच घरातून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लागणारी वैद्यकिय उपकरणे असणार असून रूग्णांच्या सेवेसाठी नर्स व डॉक्टरांची सुध्दा मोफत सुविधा असणार आहे.
शव नेण्याकरीता बर्फा पेटीच्या जागेची व्यवस्था
रूग्ण मृत्युमूखी पडल्यानंतर रूग्णांलयातून किंवा घरातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी अँब्युलन्समधून तर कधी-कधी खाजगी वाहनातून ही मृतदेह न्यावा लागतो. त्यातही अँब्युलन्समधून किंवा खाजगी वाहनातून कोरोनाने मृत झालेल्या रूग्णास स्मशानभूमी मध्ये नेल्यानंतर त्या गाडीचे योग्य प्रकारे सॅनिटायझरिंग न केल्यामुळे इतर लोकांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी मोक्षरथाची सुविधा देण्यात आली असून मोक्षरथासाठी मृतांच्या नातेवाईकांनी महानगरपालिकेला कळविल्यानंतर शववाहिकेची महानगरपालिकेतर्फे मोफत सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधीने मृत्यू झालेल्या व्यक्तीस अंत्यसंस्कारासाठी गावी किंवा इच्छित स्थळी घेऊन जायचे असल्यास मोक्षरथाचा उपयोग होऊ शकतो. या गाडीमध्ये लांब पल्यासाठी शव नेण्याकरीता बर्फाच्या पेटीच्या जागेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.