ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ३ - रायगड जिल्ह्यातील महाडच्या दुर्घटनेत वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यासाठी महाबळेश्वर येथील ‘ट्रॅकर्स’ सावित्री नदीच्या महापुरात उतरले आहेत. एकूण बावीस स्वयंसेवक बुधवारी सकाळपासून तहान-भूक विसरून शोधकार्यात उतरल्याचे पाहून ‘रायगड’च्या मदतीला ‘प्रतापगड’ धावला, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली. सावित्री नदीचे उगमस्थान श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरात आहे. गोमुखातून प्रकटणा-या पाच नद्यांपैकी एक सावित्री.
कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री अन् गायत्री अशा या पाच नद्यांपैकी शेवटच्या दोघी कोकणाकडे झेपावलेल्या. महाबळेश्वरच्या घाटात छोटीशी वाटणारी सावित्री नदी महाडला मात्र मोठे रूप प्राप्त करते. यंदा महाबळेश्वरच्या खो-यात विक्रमी पाऊस पडला. कमी कालावधीत जास्त पाऊस ज्याला ढगफुटी असेच म्हणावे लागेल, असा हा मुसळधार पाऊस यंदा सावित्री नदीला महापुराचे रूप देऊन गेला.
महाड येथील नदीत वाहून गेलेल्या बावीस जणांचा शोध घेण्यासाठी नौदलासह सर्वच शासकीय यंत्रणा सकाळपासूनच कामाला लागली आहे. दरम्यान, प्रत्यक्ष महापुरात उतरण्याचा अनुभव असणारी महाबळेश्वरची टीमही याठिकाणी पोहोचली आहे.‘महाबळेश्वर ट्रॅकर्स’ आणि ‘सह्याद्री ट्रॅकर्स’ या दोन स्वयंसेवी संस्था सातारा जिल्ह्यातील संकटग्रस्तांना नेहमीच मदत करत आल्या आहेत. महाबळेश्वर अन् आजूबाजूच्या दुर्गम घाटात एखादे वाहन खोल दरीत कोसळले तर हीच मंडळी जीव धोक्यात घालून खाली उतरतात. अथक परिश्रमानंतर संकटग्रस्तांना वाचवतात. महाडमध्येही या मंडळींचे धाडस सर्वांना पाहायला मिळाले.
बावीस जणांचा शोध घेण्यासाठी नेमकी बावीस जणांची टीमच नदीच्या पात्रात उतरली आहे. वर मुसळधार पाऊस अन् खाली उसळता महापूर, अशा अवस्थेतही हे ट्रॅकर्स जीवाची बाजी लावून बुडालेल्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
'महाबळेश्वर ट्रॅकर्स' नावे :- सुनिल भाटिया,निलेश बावळेकर ,ओंकार नाविलकार, सुनिल केळघणे , सनी बावळेकर ,जंयवत बिरामणे , संदिप जांभळे , दिनेश झाडे, रवि झाडे.
'सह्याद्री ट्रॅकर्स' नावे :- संजय पार्टे , संजय भोसले , विजय केळघणे , अक्षय कांबळे , अक्षय शेलार, आकाश शेलार,वैभव जाणकर, हुसेन तांबोळी.