पंढरपूर/अकलूज : माजी सहकार राज्यमंत्री आणि सोलापूरचे माजी खासदार प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे सोमवारी मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी पद्मजादेवी, मुलगा धवलसिंह, मुलगी धनश्री, स्नुषा उर्वशीराजे, जावई आदित्य घुले-पाटील नातवंडे असा परिवार आहे.गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांना आधी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती खालावत गेल्याने नंतर त्यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी आठ वाजता अकलूज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रतापसिंहानी १९८५मध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला. जि. प. सदस्य झाल्यानंतर ते थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. २००४च्या पोटनिवडणुकीत त्यांनी सोलापूर लोकसभेची जागा भाजपाच्या तिकीटावर लढविली आणि काँग्रेसचे आनंदराव देवकते यांचा पराभव केला. त्यानंतर मात्र त्यांनी पु्न्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानपरिषद सदस्यत्व मिळविले. २००९च्या निवडणुकीत त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा नारळही फोडला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी दाखल केल्यावर त्यांना पाठिंबा देत त्यांनी उमेदवारी मागे घेतली.त्यांनतर २०१४मध्ये त्यांनी पुन्हा एकदा माढातून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात ते अपक्ष म्हणून लढले. मात्र त्यांना सख्ख्या भावाविरुध्द मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र ते राजकारणात अधिक सक्रिय राहिले नाहीत.---------प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी खासदार आणि विधान परिषद सदस्य म्हणून केलेले काम हे सोलापूरकरांना स्मरणात राहील.-सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री
----------कोणतेही निर्णय ते धाडसाने घ्यायचे़ त्यांचे हे निर्णय राजकारणातील कोणत्याही नेत्याला लाजवेल असे होते़ सर्वसामान्य माणसांच्या विकासाला प्राधान्य देणारा विकासरत्न हरपला़ - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस