सासवड : संत ज्ञानेश्वरमहाराजांचे धाकटे बंधू संत सोपानकाका यांची संजीवन समाधी सासवड येथे आहे. सासवडच्या पश्चिमेला असलेल्या भोगावती (चांबळी) नदीकाठी सोपानदेवांचे समाधी मंदिर आहे. सोपान देवांनी शके 1218 मध्ये सासवड येथे समाधी घेतली. समाधी प्रसंगी संत मंडळींसमवेत खुद्द विठ्ठल येथे आले होते, अशी समजूत आहे.
समाधी मंदिरात समाधीमागे श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. समाधीच्या दक्षिण बाजूस विस्तीर्ण असा जुना चिंचेचा वृक्ष आहे. तेथे सोपानदेवांच्या पादुका आहेत. येथूनच समाधिस्थळी सोपानमहाराजांनी प्रवेश केल्याचे सांगतात. मंदिराच्या आवारात दत्तमंदिर आहे. आवार भव्य असून दोन्ही बाजूंना ओव:या आहेत. भागवत संप्रदायातील आदरणीय सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते मंदिराच्या कळसाचा जीर्णोद्धार झाला. संत सोपानकाकांनी ‘सोपानदेवी’ हा ग्रंथ लिहिला आहे. मंदिराच्या आवारात सासवड येथी बँक ऑफ इंडिया व भाविकांच्या मदतीने भिंतीवर सोपानदेवी ग्रंथ कोरला आहे. त्याचप्रमाणो मंदिराबाहेर कमान उभी केली आहे. मंदिराच्या बाहेर सासवड नगर परिषदेने तीर्थक्षेत्र आराखडय़ातून संपूर्ण मैदान सिमेंटचे केले आहे. त्याचप्रमाणो नळकोंडाळी व स्वच्छतागृहे बांधली आहेत.
वारकरी भाविक आळंदी, पंढरपूर येथे जाताना सोपानदेवांच्या दर्शनासाठी येथे येतात. संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळा आषाढ वारीसाठी पंढरपूरकडे जाताना सासवड येथे दोन दिवस मुक्कामी असतो, त्या वेळी लाखो वारकरी दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिरात एकादशीच्या दिवशी गर्दी असते. कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम सुरू असतात. दर वर्षी मार्गशीर्ष महिन्याची वद्य अष्टमी ते त्रयोदशीर्पयत सोपानदेवांचा उत्सव साजरा होतो.
अध्यात्म ज्ञानाचे केंद्र
सासवडचे मंदिर म्हणजे अध्यात्म ज्ञानाचे केंद्र आहे. मंदिरात प्रवेश केला, की दर्शनी भागी पूर्वेस श्री नागेश्वराचे शिवमंदिर आहे. त्याच्या मागे सोपानकाकांचे मंदिर आहे. मंदिरासमोर भव्य कीर्तन मंडप दिसतो. सरदार पानसे यांनी मराठे विरुद्ध हैदर संग्रामात येळकोट येथे विजय मिळवून भरपूर लूट मिळवली. त्यांनी लक्ष्मीनारायणाची मूर्ती व चंदनाचे सुबक खांब बरोबर आणले. ते खांब सोपानदेवांच्या समाधी मंदिरात आजही लावलेले दिसतात. कीर्तन मंडपानंतर मंदिरात लहानसे प्राकार आहे. त्यात श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीराम-सीता यांची मंदिरे आहेत.