मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सोमवारपासून पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरे जात आहे. तर याचवेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरेकर यावेळी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे प्रमुखाने पक्षप्रमुख म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगितलं होत की, शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार रुपये तर बागायतीसाठी 50 हजार मदत म्हणून देऊ. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर दिलेल्या त्या वचनाच काय झालं असा प्रश्न दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.
त्याचप्रमाणे याच सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता. मात्र प्रत्यक्षात सरसकट कर्जमाफी झाली नसून, यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावे. तसेच महराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, या संदर्भात सरकार उदासीन असल्याचा आरोप सुद्धा दरेकर यांनी केला आहे.