मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मागणीवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरेकर म्हणाले की, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच वचन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते. मात्र त्या वचनाला हरताळ फासण्याचं काम होत आहे. तसेच राज्यामध्ये महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना मोठ्याप्रमाणावर वाढल्या असताना त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या विषयासंबधी विधानसभा आणि विधानपरिषेदत स्थगन प्रस्ताव देत चर्चेची मागणी केली असता, दोन्ही सभागृहमध्ये विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्याच काम सरकारकडून करण्यात येत आहे. दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे सरकारची लक्तरे सभागृहात काढू या भीतीपोटी विरोधकांचा आवाज दाबण्याच काम केलं जात आहे. परंतु आम्ही या विषयापासून लांब हटणार नाही, असा इशारा दरेकर यांनी सरकाराला दिला.