लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : आचार्य अत्रे यांच्या सासवड या जन्मगावी आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रवीण दवणे यांची व स्वागताध्यक्षपदी दशरथ ऊर्फ बंडूकाका विठ्ठल जगताप यांची निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखाअध्यक्ष रावसाहेब पवार यांनी ही माहिती दिली. दर वर्षी अत्रे यांच्या जयंतीनिमित्त सासवड येथे विभागीय साहित्य संमेलन अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखेच्या वतीने आयोजित केले जाते. या वर्षी अत्रे यांच्या ११९व्या जयंतीनिमित्त २०वे संमेलन १३ व १४ आॅगस्ट रोजी सासवड येथे आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटक सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री या पदांवर काम केले असले, तरी एक उत्कृष्ट साहित्य रसिक म्हणून त्यांची ख्याती आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रवीण दवणे कवी, लेखक, गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वागताध्यक्ष दशरथ ऊर्फ बंडूकाका जगताप प्रगतिशील शेतकरी आहेत. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाचे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पहिले असून, ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासद आहेत.या वर्षीचे साहित्य संमेलन अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड येथे दोन दिवस असून संमेलनात उद्घाटनाव्यतिरिक्त कविसंमेलन, परिसंवाद, बाल आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन उत्साही व आनंदी वातावरणात साजरे होणार असून साहित्यप्रेमींनी उदंड प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विजय कोलते, रावसाहेब पवार व बंडूकाका जगताप यांनी केले आहे.
अत्रे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण दवणे
By admin | Published: July 04, 2017 3:13 AM