शिक्षेबद्दल नाराजी : मुलताई न्यायालयाचा निकाल अमरावती : मध्यप्रदेशातील पट्टणघाट येथे घडलेल्या बहुचर्चित पत्नी व दोन मुलींच्या तिहेरी हत्याकांडातील आरोपी प्रवीण ज्ञानेश्वर मनवर याला मुलताई येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपी प्रवीण मनवर याचा अमरावतीच्या शामनगरातील सखाराम ढाणके यांची मुलगी शिल्पा हिच्याशी सन २००४ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्यात. त्यांचा सुखी संसार सुरू असतानाच २ मार्च २०१५ रोजी प्रवीण याने पत्नी शिल्पा, मुलगी शर्वरी (९) व परिणिती (२) यांना अमरावतीहून कारने मध्यप्रदेशातील पट्टणघाट मार्गावर नेले आणि पेट्रोेल टाकून कार पेटवून पत्नीसह दोन मुलींचा निर्घृण खून केला.
या घटनेमुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली होती. याप्रकरणी ९ मार्च २०१५ रोजी प्रवीण मनवर हा अमरावती ग्रामीण पोलिसांना शरण गेला होता. त्याने अपघाताचा बनाव करीत पोलिसांची दिशाभूल केली होती. पश्चात आपण एचआयव्हीबाधित असल्याचे प्रवीणने पोलिसांना सांगितले होते. मात्र, वैद्यकीय तपासणीअंती तो एचआयव्हीबाधित नसल्याचे निष्पन्न झाले होते. शिल्पाचा भाऊ अजय ढाणके यांच्या तक्रारीवरून मुलताई पोलिसांनी आरोपी प्रवीण मनवरविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता.
गुरूवारी या तिहेरी हत्याकांडाचा मुलताई येथील द्वितीय सत्र न्यायाधीश तिवारी यांनी निकाल सुनावला. यात प्रवीण मनवर याने पत्नी शिल्पा व दोन मुलींची हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा तसेच १ लाख ३० हजार रूपयांचा दंड ठोठावला. सरकारपक्षातर्फे अतुल शर्मा यांनी बाजू मांडली. शिक्षेबाबत संजय ढाणके यांची नाराजीमृत शिल्पा हिचे मोठे बंधू संजय ढाणके यांनी आरोपी प्रवीणला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रवीणला फाशीच दिली जावी, अशी मागणी करीत या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. मध्यप्रदेश प्रशासनाचे सहकार्यया संपूर्ण प्रकरणात मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवीत क्रूरकर्मा प्रवीण मनवर याला अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केलेत. पोलीस प्रशासनाच्यावतीने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक एस.पी.सिंह आणि विद्यमान पोलीस अधीक्षक राकेश जैन यांनी स्वत: या संपूर्ण प्रकरणाची सूत्रे सांभाळीत मुलताई पोेलीस स्टेशन आणि विशेष पोलीस टीम तयार करून तपास केला होता, हे विशेष. अपील करावयाची मुभामुलताई न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणात क्रुरकर्मा प्रवीण मनवर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून यावर मृत शिल्पाचा भाऊ संजय ढाणके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फाशीची मागणीदेखील त्यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी बैतुल जिल्हा प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित परिवाराने शिक्षेबद्दल आमच्याकडे तसा अर्ज करावा. त्याचे परीक्षण केले जाईल. त्यासाठी उपसंचालक दर्जाचे अधिकारी असून ते सर्व बाबी तपासतील व निर्णयाप्रती उच्च न्यायालयात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी अपील दाखर करेल.-ज्ञानेश्वर बी.पाटील, जिल्हाधिकारी, बैतुल