मुंबई:महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अंतर्गत वाद मधून-मधून समोर येत असतात. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. आम्हाला एकदा त्यांनी सांगून द्यावे की त्यांना भाजपासोबत जायचेय. ते एकदा पहाटे गेलेच होते भाजपासोबत. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावरून भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पलटवार केला आहे. सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही. तोंडाच्या वाफा घालवण्याशिवाय नाना पटोले दुसरे काहीच करू शकत नाही, असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला आहे.
नाना पटोले फक्त आरोप करण्यापलिकडे काही करू शकत नाही. सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत त्यांच्याकडे नाही. त्यामुळे केवळ शाब्दिक आरोप नाना पटोले करतायत. त्यामुळे त्यांच्या वादावर फार प्रतिक्रिया देणार नाही, असा खोचक टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत आहे का?
आता त्यांना खंजीरच्याही गुदगुल्या होत असतील, तर त्याला आम्ही काय म्हणायचे, अशी विचारणा करत एकीकडे खंजीर खुपसला म्हणायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचे. काँग्रेसमध्ये सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत आहे का, तर नाही. ते वाद घालतील. सत्तेत राहण्यासाठी काहीही करतील. आम्ही एकमेकांना घट्ट धरून आहोत, असेही म्हणतील. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावर बोलण्यात अर्थ नाही, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला. ते टीव्ही९ शी बोलत होते.
दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांवर ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईवर बोलताना, ज्या पद्धतीने राज्य सरकारने हैदोस घातला आहे. पोलिसांचा गैरवापर करण्याचे प्रकार सुरू आहेत. इतिहासात अशी कारवाई झाली नसेल. हे सरकारला शोभणारे नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.