BJP Pravin Darekar News: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत, तो डाव मी मोडणार अशा प्रकारचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट हाच आहे. अशा प्रकारची वक्तव्य करायला मनोज जरांगेंना कुणीतरी ब्रिफिंग देतेय का हे तपासण्याची गरज आहे, अशी टीका भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, आपले शस्त्र हत्यार म्हणून वापर होतो आहे का, याची तमाम मराठा समाजाला चिंता आहे. देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विश्वास आहे. त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले, टिकवले. मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या हिताच्या अनेक योजना, सवलती आणल्या. आताही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण दिले आहे. ते टिकवण्याची हमीही दिलेली आहे. सगेसोयरे बाबतीत मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. सगेसोयऱ्याच्या विषयावर चर्चेतून मार्ग निघू शकतो. परंतु केवळ देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचे, एकेरी बोलायचे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला.
विरोधी पक्ष बैठकीला आला नाही त्यावर बोलायचे नाही
मराठा समाज बरोबर आहे, म्हणून देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारचे टार्गेट करणे योग्य नाही, हे जरांगेंनी समजून घेण्याची गरज आहे. महायुती सरकारने महाराष्ट्रातील उपेक्षित समाजाला अनेक योजना आणून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्याचा अजेंडा आपण राबवताय की काय? विरोधी पक्षाचा अजेंडा आपण राबवताय की काय? फडणवीसांच्या विरोधातील ज्या काही शक्ती आहेत, त्यांचा अजेंडा आपल्यामार्फत राबविला जातोय की काय? अशा प्रकारचा संशय येत आहे. जरांगेंनी केवळ आंदोलनाच्या विषयावर सरकार म्हणून बोलावे. केवळ देवेंद्र फडणवीसांवर बोलू नये. बाकी विषय बाजूला राहतात. विरोधी पक्षाबाबत बोलायचे नाही. विरोधी पक्ष बैठकीला आला नाही त्यावर बोलायचे नाही. महाराष्ट्रासमोर आणि जरांगे पाटील यांच्या समोर केवळ देवेंद्र फडणवीस हा एकमेव प्रश्न आहे, असे त्यांच्या वक्तव्यातून वाटते, असे दरेकर म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र रक्तबंबाळ व्हावा, असा डाव असता तर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्रीला सर्वपक्षीय बैठकीसाठी पुढाकार घेतला असता का? ते राज्याचे गृहमंत्री आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आणि कर्तव्य त्यांचे आहे. ते राज्य रक्तरंजित कसे होऊ देतील. ते रक्तरंजित होऊ नये यासाठीच त्यांचा अट्टाहास आहे. गृहमंत्री म्हणून जरांगेंनी साथ देऊन शांततेत चर्चेच्या मार्गातून मराठा समाजाला न्याय द्यावा. उगाच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा चर्चेतून, समन्वयातून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी. हे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे.