वैभव गायकर
पनवेल:नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांच्या मार्फत होत आहे. याकरिता रायगड, ठाणे, पालघर, कल्याण याठिकाणी हि चळवळ निर्माण झाली आहे. येत्या २४ तारखेला प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला घेराव घालण्याचा देखील निर्धार केला असून भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्थानिक जनभावनेचा विचार करून विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे असे वक्तव्य शुक्रवारी माध्यमांसमोर बोलताना केले आहे.
अवंती शासकीय निवासस्थान मुंबई येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दरेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरेकर म्हणाले की, नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिल्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांचे समाजभूषण दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, असे दरेकर यांनी सांगितले.
विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबत सिडको महामंडळाने केलेल्या ठरावास शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. स्थानिक विरोध डावलून शिवसेना विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचा नाव देण्याबाबत ठाम आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या ठरावाला राज्य शासनाने मंजुरी देऊन तो ठराव केंद्राकडे पाठविला असल्याचे वक्तव्य केले आहे. अशावेळी दरेकर यांनी केलेले वक्तव्य महत्वपूर्ण असून भाजपचा दिबांच्या नावाला पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. नामकरणाच्या वादाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे.