बुलडाणा: अेाबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपी भूमिका स्पष्टच आहे. मात्र संजय राऊतांना उठल की केंद्र, भाजप आणि फडणविसांच्या नावाने शिमगा करण्याच कामच आहे. मराठा आरक्षणा संदर्भातील आपले अपयश किंबहुना निष्क्रियता दुसऱ्यावर ढकलण्याचा त्यांचे प्रयत्न असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील धाड २९ मे रोजी येथे केली. धाड येथे भाजपच्या आ. श्वेता महाले यांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आ. श्वेता महाले, माजी आ. चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे उपस्थित होते.
शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मराठा आरक्षणांचा मुद्दा हा केंद्राचा आहे. नरेंद्र मोदींकडे हुकमाची पाने आहेत, असे वक्तव्य केले असल्याबाबत दरेकर यांना विचारले असता त्यांनी उपरोक्त टिका केली. सोबतच मराठा आरक्षणासंदर्भात हुकमी एक्का नरेंद्र मोदी आहेत हे त्यांनी सांगण्याची अवश्यकता नाही. आम्ही स्वत: त्यांच्याकडे जाऊन मराठा आरक्षणासंदर्भात मागणी करू असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान आपल्या संविधानामध्ये यासाठी एक प्रक्रिया आहे. त्यानुषंगाने काम कराव लागत. मात्र यावर सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे, असेही दरेकर पुढे म्हणाले.दुसरीकडे छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांना भेटणे काही गैर नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. जाणीवपूर्वक मराठा आरक्षण कसे जाईल यासाठीच यांनी प्रयत्न केल्याचा आपला जाहीर आरोप असल्याचेही दरेकर यावेळी बोलताना म्हणाले. केवळ राज्यपालांना पत्र देऊन हा प्रश्न सुटत नाही. आरक्षण मिळणे ऐवढे सोपे असते तर गेल्या ३० ते ३५ वर्षात यांनी का दिले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रश्नावर भेटू. आमची या विषयावर दुटप्पी भूमिका नाही. आम्ही यासाठी प्रयत्न करत असल्याचेही सांगत त्यांनी राज्यातील सध्याच्या सरकारवर टिका केली.