मुंबई : मनसेचे नाराज असलेले माजी आमदार प्रवीण दरेकर हे याच आठवड्यात आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपला राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत.दरेकर यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाकरिता नेत्यांना जबाबदार ठरवल्यानंतर त्यांच्याविरोधात पक्षात वातावरण निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भाजपाचे नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची देखील त्यांनी मुंबईत भेट घेतली. त्यामुळे दरेकर शिवसेनेत जाणार की भाजपात याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.याबाबत दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, याच आठवड्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण निर्णय जाहीर करणार आहोत. गडकरी हे ‘शब्दगप्पा’ कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आले होते. त्यावेळी तेथे आपली त्यांच्याशी भेट झाली हे खरे आहे. मात्र ती गुप्त बैठक नव्हती व तेथे राजकीय चर्चा झाली नाही.माझ्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना व भाजपात प्रवेश करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. काही कार्यकर्त्यांचा मनसे न सोडण्याचा आग्रह आहे. त्यामुळे सर्वांशी बोलून निर्णय करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
प्रवीण दरेकरांचा आठवड्यात निर्णय
By admin | Published: January 05, 2015 6:22 AM