मुंबई : मालेगावमधील २००८च्या बॉम्बस्फोटातील आरोपी प्रवीण टक्कल्की याची विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास पथक) न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. तसेच दोन हमीदार हजर करण्याचे निर्देशही दिले.विशेष एनआयए न्यायालयाने प्रवीण टक्कल्कीला महिन्याच्या ३० व्या दिवशी न्यायालयापुढे हजर राहण्याचा आदेश दिला. त्याशिवाय खटल्यादरम्यानही उपस्थित राहण्यास सांगितले. टक्कल्की याचे नाव पुरवणी आरोपपत्रात असल्याने त्याच्या जामीन अर्जावर एनआयएनेही आक्षेप घेतला नाही. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंग व प्रवीण टक्कल्की यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्याचे पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे. एनआयएने दिलेल्या क्लीन चिटनंतर टक्कल्कीने न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि टक्कल्की यांचे चांगले संबंध असल्याने टक्कल्कीला २०११ मध्ये अटक करण्यात आली. टक्कल्कीविरोधात काहीही पुरावे नाहीत केवळ त्याने दिलेला कबुलीजबाब इतकाच त्याच्याविरुद्ध पुरावा आहे. टक्कल्कीने दिलेला कबुलीजबाव पुरावा म्हणून वापरता येणार नाही, असे म्हणत एनआयएने या सर्व आरोपींवरील ‘मकोका’ हटवण्याची विनंतीही न्यायालयाला केली होती. काहीच दिवसांपूर्वी या केसमधील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. एनआयएने क्लीन चिट दिल्याच्या आधारावरच साध्वीनेही जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तिच्याही जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप घेतला नव्हता. बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली मोटारसायकल साध्वीचीच असल्याचे म्हणत न्यायालयाने तिचा जामीन मंजूर करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
प्रवीण टक्कल्कीची जामिनावर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2016 12:58 AM