गोंदिया : हवामान विभागाने येत्या तीन चार दिवसात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (दि.३) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकटासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जिल्हावासीयांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगामपूर्व कामासाठी देखील हा पाऊस अनुकुल मानला जात आहे. हवामान विभागाने ५ जूनपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शंभर मि.मी. पाऊस झाल्या शिवाय खरीप हंगामातील पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. मान्सून पूर्व पावसाचा काही प्रमाणात रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्रांना सुध्दा फटका बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.