लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याच्या विविध भागात शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अंगावर झाड, दगड कोसळून ४ तर वीज पडून ७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये नंदुरबार, बीड, जळगाव, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील घटनांचा समावेश आहे. वृक्ष आणि विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. पिकांचे नुकसान व पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, लातूर, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातही असंख्य झाडे आणि विजेचे खांब पडले. वादळाने शहादा, नवापूर, अक्कलकुवा तालुक्यात जवळपास ४० घरांचे पत्रे उडाले. वादळी पावसामुळे नंदुरबारमधील शहादा तालुक्यासह नांदेडमधील मुदखेड तालुक्यात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या.
बीड : अंबलटेक (ता. अंबाजोगाई) येथील भरत मुंडे, जळगाव : दगडी सबगव्हाण (ता. पारोळा) सुनील भिल-ठाकरे (३२), अहमदनगर : म्हाळादेवी (ता. अकोले) येथे रामदास उघडे (५६). सोलापूर : गुळसडी येथे कमल अडसूळ (४५), सोलापूर : काळूबाळूवाडी येथे भगवान व्हनमाने (४२), वाशिम : भर जहागीर येथे संदीप काळदाते (३२), वाशिम : मुसळवाडीचे नारायण कदम (३०) या सात जणांचा वीज पडून मृत्यू झाला. नंदुरबार : प्रतापपूर येथील राजेंद्र मराठे (वय ४८), बुलढाणा : गेरू माटरगावात फांदी पडून किशोर खोडके (२४)याचा मृत्यू झाला. रायगड : दाेन ठार.
सात जखमी
जळगावातील शिरसोली नाका परिसरात भिंत कोसळून १ तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवमहापुराण कार्यक्रमादरम्यान सहा महिला किरकोळ जखमी झाल्या.
केरळमध्ये मान्सूनची तारीख चुकली
नवी दिल्ली : केरळमध्ये रविवारी मान्सूनची सुरुवातीची तारीख चुकली. हवामान खात्याने आणखी तीन ते चार दिवस उशीर होण्याची शक्यता वर्तवली. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये येतो. केरळात मान्सून येण्याचा हा कालावधी १ ते ७ जून असा आहे.
- केरळात ४ जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हवामान खात्याने म्हटले आहे की, केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठीची अनुकूल परिस्थिती पुढील तीन-चार दिवसांत आणखी सुधारेल.
- विलंबामुळे खरीप पेरणीवर आणि देशभरातील एकूण पावसावर परिणाम होण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मान्सून आगमन
२०१८ २९ मे२०१९ ८ जून २०२० १ जून२०२१ ३ जून२०२२ २९ मे