अजित पवारांनी महायुतीत असूनही नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचा मलिक यांना प्रचंड विरोध आहे. मविआच्या सत्ताकाळात मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची राळ उठविली होती. दाऊदशी संबंध, मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. आता पुन्हा मलिक यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ भाजपावर आली आहे. यामुळे निवडणुकीत याचा फटका बसण्याच्या शक्यतेने भाजप सावध पवित्रा घेत आहे. मलिक यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजप घेत आहे. याला मलिक यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मला मिळालेला आहे. ज्यांनी उमेदवारी दिली ते मला हा फॉर्म मागे घेण्याचा आग्रह धरणार नाहीत. अजित पवारांवर मला विश्वास आहे. आमच्याकडे परिस्थिती काय आहे ते मला कळत आहे. अजित पवार माघार घेणार नाहीत. माझ्या विरोधात महायुतीचे नेते उमेदवार ठेवतील, माझ्या विरोधात प्रचार यंत्रणा राबवतील तरीही मी निवडून येणार आहे, असे मलिक म्हणाले.
आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देणार नाही, प्रचार करणार नाही अशी भूमिका मांडली आहे. यावर मलिक यांनी, मी कुठे सांगतोय माझा प्रचार करा, मला पाठिंबा द्या, अशा शब्दांत सुनावले. मला त्यांचा विरोध असणार हे मला अपेक्षितच आहे, असे मलिक म्हणाले.
सपाकडे १९९७ सालापासून बहुतांश या मतदारसंघाचा एरिया आहे. त्यांचे नगरसेवक आहेत. अनुशक्ती नगर आणि शिवाजीनगरचे एकंदरीत तेरा वॉर्ड आहेत. मुंबईतील सर्वात मागासलेला हा वॉर्ड आहे, घाणेरडा आहे. आमच्याकडे ब्लू प्रिंट आहे आमचा व्हिजन आहे ते व्हिजन घेऊन आम्ही काम करणार, असे मलिक यांनी स्पष्ट केले.