मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आहे. २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. परिपाठातले इतर विषय वगळण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची मूलतत्त्वं रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दररोज परिपाठ होतो. या परिपाठातले विषय शाळा ठरवते. या परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात यावं, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. परिपाठातले इतर विषय वगळून त्याऐवजी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जावं, असे आदेश सरकारनं दिले आहे. २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. सत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता. मात्र तत्कालीन सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केली नव्हती. आता उद्धव ठाकरे सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधानातली मूलतत्त्वं विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी ठाकरे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; 26 जानेवारीपासून शाळांमध्ये लागू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 4:01 PM