रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण ऊर्फ आर. के. लक्ष्मण हे सुप्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांचे धाकटे बंधू. २४ आॅक्टोबर १९२१ रोजी म्हैसूर येथे या महान व्यंगचित्रकाराचा जन्म झाला. वडील शाळेत मुख्याध्यापक असल्याने अनेक नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. हार्पर्स, पंच, आॅन पेपर, बॉइज आदी मासिकांमधील चित्रे पाहातच रंगरेषांविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण झाली. आपणही अशी चित्रे रेखाटावी, असे त्यांना वाटू लागल्याने ते चित्रे काढू लागले. अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रात छापून येऊ लागली. मुंबईतील जे. जे. स्कूल आॅफ आटर््स येथे त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. मग नोकरीच्या निमित्तासाठी त्यांनी दिल्ली गाठले. हिंदुस्थान टाइम्सने वय कमी असल्याच्या सबबीखाली त्यांना नोकरी नाकारली. काही काळ ब्लिट्स आणि नंतर फ्री प्रेस जर्नलमध्ये लक्ष्मण यांनी काम केले. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही, असा मालकाचा दंडक असल्याने त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर तब्बल अर्धशतक त्यांनी टाइम्स आॅफ इंडिया वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून अद्वितीय कामगिरी नोंदविली. व्यंगचित्रांप्रमाणेच विडंबनचित्र काढण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील डावपेच, ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे राजकारण असो किंवा दक्षिण आफ्रिकेतील सत्ताधाऱ्यांचे बेमुर्वतखोर वांशिक धोरण; त्यांनी आपल्या कुंचल्याद्वारे त्यावर मार्मिक भाष्य केले. भारतीय राजकारणातील गमतीजमती ते व्यंगचित्रांतून मांडत. राजकारण्यांच्या दांभिक वृत्तीवर त्यांनी कठोर टीका केली. त्यांचा ‘कॉमन मॅन’ हा तर त्यांच्या व्यंगचित्रांच्या कारकिर्दीतील कळसच म्हणावा लागेल. ‘कॉमन मॅन’प्रमाणेच एशियन पेंटसाठी त्यांनी काढलेले ‘गट्टू’चे चित्रही लोकप्रिय ठरले.आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या ‘मालगुडी डेज’ या लघुकथांच्या संग्रहासाठी त्यांनी चित्रे काढली. ‘आयडल अवर्स’, ‘द हॉटेल रिव्हिएरा’, ‘बेस्ट आॅफ लक्ष्मण’, ‘द मेसेंजर’, ‘अ व्होट आॅफ लाफ्टर’ ( विनोदी अर्कचित्रे) ही त्यांची पुस्तके व्यंगचित्रकारांसाठी मानबिंदू ठरली. ‘द टनेल आॅफ टाइम’ हे त्यांचे इंग्रजीमधील आत्मचरित्र ‘लक्ष्मणरेषा’ या नावाने मराठीत प्रसिद्ध आहे. पन्नास वर्षांहून अधिक कारकिर्दीत ते अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे आदी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डी.लिट़ ही सन्माननीय पदवीही दिली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कारही त्यांना मिळाला.
अर्धशतकाचा मार्मिक भाष्यकार
By admin | Published: January 28, 2015 5:05 AM