ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय उद्यादुपारी तीन वाजता दोषीला शिक्षा सुनावणार आहे. याप्रकरणी शिक्षेसंबंधी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आहे. सरकारी पक्षाने दोषी अंकुर पनवारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दिल्लीहून नौदलाच्या हॉस्पिटलमधील नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईत आलेल्या प्रीतीवर अंकुरने २ मे रोजी अॅसिड हल्ला केला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रीतीला मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर एक जून रोजी महिनाभर तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.
या हल्ल्यात प्रीतीच्या एका डोळ्याला दुखापत झाली होती, तर अॅसिडचे काही थेंब तोंडातही गेल्याने अन्ननलिकेला मोठ्या प्रमाणावर इजा पोहोचली होती. तिच्यावर भायखळ्याच्या मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
मात्र, पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या कार्डिओ थोरॅसिक सर्जरीची सुविधा या हॉस्पिटलमध्ये नसल्याने तिला १८ मे रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. त्यानंतर ती व्हेन्टिलेटरवरच होती. अॅसिडमुळे तिच्या शरिरातला एकेक अवयव निकामी होत गेला आणि अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली.