बल्लारपूर – चंद्रपूर इथं एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्कूटीवरून ही महिला तिच्या ४ वर्षाच्या मुलासह बामनी-राजूरा मार्गावरील वर्धा नदीच्या पूलावरुन जात होती. त्यावेळी स्कूटी बॅलेन्स बिघडला आणि महिला स्कूटीसह ३० फूट खाली कोसळली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. तर ४ वर्षाचा मुलगा जखमी अवस्थेत आईच्या मृतदेहाला मिठी मारून रडत होता. आईस्क्रीम घेऊन देते, असे सांगून मुलासोबत स्कुटीने ही महिला बुधवारी सायंकाळी घरातून बाहेर पडली होती. या आईचा वर्धा नदीत पडून मृत्यू झाला, तर रात्रभर तिथेच जखमी अवस्थेत पडलेल्या चार वर्षांच्या मुलाला पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं आहे. सुषमा पवन कुमार काकडे (२९, बामणी, बल्लारपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
आदित्य प्लाझा येथे पवन कुमार काकडे हे कुटुंबासह राहतात. ते बल्लारपुरातील एका बँकेत नोकरीला आहेत. बुधवारी सायंकाळी ते घरी गेले असता त्यांच्या चार वर्षीय मुलाने आईस्क्रीम घेऊन देण्याचा आग्रह आई वडिलांकडे धरला. त्यानंतर आई सुषमा ही आईस्क्रीम घेऊन देण्याकरिता मुलाला सोबत घेऊन स्कुटीने सायंकाळी घराबाहेर निघाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी परत आले नाहीत. पती पवन कुमार काकडे यांनी पत्नी व मुलाबाबत नातेवाइकांकडे चौकशी केली. पण, त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली.
मोबाइल लोकेशनवरून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पहाटे राजुरा पुलाखाली पाहणी केली असता सुषमाचा मृतदेह आढळला. बाजुलाच मुलगा चिखलात पडून होता. त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली. सुषमा ही ३ महिन्याची गर्भवती होती. बामनीहून राजूराला जाताना वाटेतच वर्धा नदी पूलावर सुषमाचं स्कूटीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ४ वर्षाचा मुलगा आणि सुषमा स्कूटीसह पुलावरून खाली कोसळले. यात सुषमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर जखमी मुलगा आईच्या मृतदेहाला कवटाळून रडत होता. अंधार असल्याने कुणाचीही या दोघांवर नजर पडली नाही.
पोलिसांनी सुषमाचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले तेव्हा ती वर्धा नदी पूलावर असल्याचे कळाले. पहाटे ४ वाजता पोलीस तिथे पोहचले. पाहणी केली परंतु काही सापडले नाही. त्यानंतर पुलाखाली लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. जवळ जाऊन पाहिले असता सुषमाचा मृतदेह नदीकिनारी पडला होता. तर ४ वर्षाचा मुलगा मृतदेहाशेजारी रडत होता. त्यालाही जखमा झाल्या होत्या. जखमी मुलाला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठवले तर सुषमाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी नेला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये सुषमाचा मृत्यू मानेचे हाड तुटल्याने झाल्याचे म्हटलं. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यू नोंद केली आहे. परंतु सुषमा आईस्क्रिम घेण्यासाठी घरापासून ५ किमी दूर का आली या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत.