प्राजक्ता ढेकळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अचानकपणे ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. गर्भवती महिलांनाही मोठ्या प्रमाणात संसर्गाची भीती सतावत आहे. कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी गर्भवतींनी काय काळजी घ्यावी. आहार, व्यायाम, मानसिक संतुलन राखावे. यासारख्या गोष्टींवर सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रुमा सात्त्विक यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.गर्भवतींनी काय खबरदारी घ्यावी?सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या स्थितीत गर्भवतींनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे घराबाहेर पडणे टाळावे. सोशल डिस्टन्सचे पालन काटेकोर करावे. हात वारंवार स्वच्छ धुणे आवश्यक आहे, अगदी तासाला किमान दोनदा साबणाने हात धुवावा. याशिवाय खोकला, सर्दी असेल तर मास्क वापरा. शिंकताना, खोकताना टिश्यू पेपर, रुमालाचा वापर जरूर करावा, जेणेकरून संसर्ग टाळाला जाईल. याबरोबरच ताप, कोरड्या खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास रुग्णालयाशी, फॅमिली डॉक्टरबरोबर संपर्क साधा, त्यांच्या सल्यानेच औषधे घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना वापरलेले कपडे व घरात घालायचे कपडे स्वतंत्रपणे धुवा, दोन्ही ठिकाणी वेगवेगळे कपडे वापरावीत. अर्थात, अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा.गर्भारपणात जीवनशैली कशी असावी?गर्भवतींनी नियमित पौष्टिक आहार घेण्यावर भर द्यावा. यामध्ये भाजीपाला, फळे, दूध, पनीर, दही अशा प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. चौरस आहारातून तुमची प्रतिकारशक्ती वाढेल याकडे लक्ष दिले जावे. मात्र, प्रत्येकवेळी खाल्ल्यानंतर चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीला बाहेर पडून व्यायाम करणे शक्य नाही. त्यामुळे या महिलांनी आहार घेतल्यानंतर किमान अर्धा तास घरातल्या घरातच चालावे. यामुळे साखरेचे प्रमाण ठीक राहील. गरोदरपणात अनेकदा साखर वाढते. त्यामुळे दिवसभरात घरातच किमान चार-पाच कि.मी. अंतर होईल एवढे चालावे.कोरोना संक्रमित आईकडून बाळाला संसर्ग होतो का?पूर्वी सार्सच्या संक्रमाणामध्ये गर्भावस्थेतच आईकडून बाळाला संक्रमण होत असल्याचे दिसून आले होते. मात्र, कोविड-१९ मध्ये अद्यापतरी गर्भावस्थेतच आईकडून बाळाला संक्रमण झालेले दिसून आलेले नाही. आईकडून बाळाला कोरोनाचा संसर्ग होतो का? यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न संशोधक करीत आहेत. मात्र, दुसरीकडे प्रसूतीनंतर संक्रमित आई आपल्या नवजात बालकाला हाताळताना संक्रमित करू शकते. त्यामध्ये अनेक स्तनपान, देखरेखीदरम्यान संसर्ग होऊ शकतो. अशा स्थितीत स्तनपानाविषयी अनेक शंका उपस्थित होतात. आतापर्यंत चीनने केलेल्या अभ्यासानुसार १४ दिवसांपर्यंत संक्रमित आईपासून बाळाला वेगळे ठेवावे. चौदा दिवसानंतर संक्रमित आईच अहवाल निगेटिव्ह येईल, तेव्हा स्तनपान द्यावे, असे म्हटले आहे.वेगवेगळ्या देशांच्या अभ्यासाचे निकष वेगवेगळे आहेत. सध्यातरी भारतात संक्रमित गर्भवतींची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे यासाठी ठोस नियमावली सध्या तरी नाही; परंतु संक्रमित आई जर स्तनपान देत असेल, तर तिने मास्क, सॅनिटायझर लावूनच नवजात बालकाला हाताळणे आवश्यक आहे.प्रसूतीनंतरची खबरदारीकोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी गर्भवती असतानाही रुग्णालयातील भेटी शक्य तितक्या कमी कराव्यात. डॉक्टरांकडून आॅनलाईन मार्गदर्शन घेण्यावर भर दिला जावा. आज अनेक डॉक्टर अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात. भेटीदरम्यान रुग्णालयातून संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.च्शक्य असल्यास घरातच ब्लडप्रेशर तपासणी कीट ठेवा व तपासणी करा. साधारण नऊ महिन्यांच्या काळात होणाऱ्या एकूण आठ- नऊ तपासणींच्या भेटी तुम्ही चारवर आणू शकता. प्रसूतीनंतर बाळाचा शक्यतो बाहेरील लोकांशी काहीकाळ संपर्क टाळा. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी राहील. बाळाला हाताळताना स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
गर्भवतींनी विशेष खबरदारी घ्यावी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:13 AM