पंढरपूर सत्र न्यायालयाचा निकाल : विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी
पंढरपूर : माझे तुझ्यावर प्रेम असून तू मला किंमत का देत नाही, असे म्हणत घरासमोर राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग करीत रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी आरोपी संजय जगन्नाथ भोसले (वय २४, रा. हुन्नुर, ता. मंगळवेढा) यास पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्या. पी. आर. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथील राधिका दीपक इंगोले या पतीसोबत पटत नसल्यामुळे आपल्या मुलीसह आईवडीलांकडे राहत होता. याचा गैरफायदा घेत घरासमोर राहणारा संजय जगन्नाथ भोसले हा नेहमी तू मला आवडत असून माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी का बोलत नाही, असा नेहमी म्हणत त्रास देत होता. याप्रकरणी सदर विवाहितेने मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरत १३ फेबु्रवारी २०१४ रोजी आरोपीने घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत तू माझ्याविरूध्द पोलिसात तक्रार का केली असे म्हणत सोबत आणलेले रॉकेल अंगावर टाकून विवाहितेला पेटवून दिले. सोलापूर येथे उपचार सुरू असताना विवाहितेचा मृत्यू झाल्याने मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पंढरपूर सत्र न्यायालयात सुनावणी होवून साक्षीदार, तपासिक अंमलदार व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. पी. आर. पाटील यांनी आरोपीस खून प्रकरणी जन्मठेप व पाच हजार रूपये दंड, विनयभंग प्रकरणी दोन वर्षे सक्तमजूरी व तीन हजार दंड, जीवंत जाळल्याप्रकरणी दोन वर्षे सक्तमजूरी व तीन हजार दंडाची शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. यात सरकारतर्फे अॅड. सारंग वांगीकर, अॅड. गोरे, अॅड. इनायतअली शेख, अॅड. रामपुरे, अॅड. कुर्डूकर तर मुळ फिर्यादीतर्फे अॅड सारंग काकडे, अॅड. चव्हाण यांनी काम पाहिले.