घरांमध्ये विजेच्या वापरासाठी प्रीपेड मीटर बसविण्यावरून लोकांमध्ये नाराजी आहे. यावरून ग्राहक पंचायतीने विरोध करताच सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घराघरात प्रीपेड वीज मीटर बसविणार नाही, अशी भुमिका घेतली होती. परंतू, प्रीपेड वीज मीटर बसविण्याची मोहिम रद्द केल्याचे जाहीर केले नव्हते. यामुळे लोकांमध्ये संभ्रम असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले आहे.
जय विदर्भ पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बावनकुळे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले आहे. ऊर्जामंत्री घरगुती मीटर लावण्यावरून लोकांमध्ये संभ्रम आहे. फक्त मोठ्या कंपन्यांमध्ये हे प्रीपेड मीटर सुरुवातीला लावण्यात येणार आहेत. जोपर्यंत जनतेच्या मनात संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत फक्त इंडस्ट्रियल ठिकाणी जिथे लॉसेस आहे त्या ठिकाणी हे स्मार्ट मीटर लागणार आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आहे. यावर सरकारसमोर बाजू मांडणार आहोत. यावर विधिमंडळात सुद्धा चर्चा होणार आहे. त्यावेळी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील, असेही बावनकुळे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आम्ही बुधवारी विश्लेषण केले आहे. हा अहवाल दिल्लीत केंद्रीय पक्षाकडे सादर केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झालेली नाही. विधान परिषदेसाठी काही नावे आमच्याकडे आली आहेत. ती आम्ही पार्लियामेंट्री बोर्डाकडे पाठवली आहेत. यात नावांवर चर्चा झाल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.