वसई : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वसई नगरीत उद्या रविवारी एकदिवसीय साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. वसई विरार महानगरपालिका, ग्रंथालय विभाग व साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने हे १७ वे संमेलन आयोजित केले आहे.रविवारी सकाळी ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कवीसंमेलन, महाराष्ट्र महोत्सव हा पोवाडा, गोंधळ, शाहिरी व भारूडाचा सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च संमेलनाची कार्यक्रम पत्रिका बनली आहे. वसईतील नवे-जुने लेखक, कवी, साहित्यिक, प्रकाशक, विद्यार्थी, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी, प्राचार्य असे सर्वच प्रथित यश या संमेलनासाठी झटत आहेत. वसई पारनाका येथून सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यात मराठी भाषेचा जागर होणार आहे.फलक, घोषणा, विविध वेशभूषा हे ग्रंथदिंडीचे वैशिष्ट्य असणार आहे. पालखीत विविध धर्माचे ग्रंथ असणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ नाटककार व पत्रकार जयंत पवार, माजी न्यायमूर्ती सी.एस.थूळ, लेखक सुभाष देशमुख, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, अभिराम भडकमकर, प्रगती बाणखेले, डॉ. महेश केळुस्कर, साहेबराव ठाणगे, महापौर प्रविणा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. त्याशिवाय पालघर जिल्ह्यातील नवे-जुने लेखक, कवी यांचाही सहभाग मोठा असणार आहे. (प्रतिनिधी) >सर्वदूरचे साहित्य रसिक लावणार हजेरीवसई पारनाका येथील अनंतराव ठाकूर नाट्यगृहात दिवसभर चालणाऱ्या या संमेलनासाठी शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक हे मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. त्याशिवाय सर्वदूरचे साहित्य रसिक यांची उपस्थिती असणार आहे. पालिकेच्या परिवहन सेवेतर्फे विरार, नालासोपारा, अर्नाळा, वसई येथून रसिकांना संमेलन स्थळी येण्यासाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्य जल्लोषचे अध्यक्ष प्रा. कोडोलिकर, अॅण्ड्र्यू कोलासो, सचिव अशोक मुळे, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, अजीव पाटील आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.
साहित्य जल्लोषची जय्यत तयारी
By admin | Published: November 19, 2016 3:33 AM